जळगाव: एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा २४ नोव्हेंबर रोजी रविवार, सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे होणार असून या कार्यक्रमाला प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (AICTE) माजी अध्यक्ष तसेच रामदेव बाबा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. एस. मंथा आणि यशस्वी उद्योजक, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही सुरेश दादा जैन यांनी केले.
कार्यक्रमाचा उद्देश आणि प्रेरणा
तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावून जागतिक स्तरावर विद्यार्थी आणि संस्था यांना स्पर्धात्मक बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रमुख अतिथी डॉ. मंथा आणि श्री. चौधरी हे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारे मार्गदर्शन करतील.
डॉ. एस. एस. मंथा तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी AICTEच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी महत्त्वाचे बदल घडवले आहेत. तर, श्री. दीपक चौधरी यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या उद्योगाला उंच शिखरावर पोहोचविले आहे. त्यांनी गुराख्याच्या मुलापासून ते २७०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा व्यवसाय उभारून तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
परिचय
डॉ. एस. एस. मंथा
शैक्षणिक पार्श्वभूमी: बडोदा येथील एमएस युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर आणि व्हीजेटीआय, मुंबई येथून पदव्युत्तर पदवी.
कार्यक्षेत्र: व्हीजेटीआयमध्ये ६ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत; त्यानंतर एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू.
योगदान: AICTEच्या अध्यक्षपदावर कार्य करताना शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जा व जबाबदारीसाठी योगदान.
दीपक चौधरी
शैक्षणिक पार्श्वभूमी: इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी.
व्यावसायिक यश: १९९४ मध्ये स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्सची स्थापना; कंपनीला NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर यशस्वी सूचिबद्ध केले.
या प्रेरणादायी सोहळ्यासाठी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक तसेच मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेवासनी, संचालक मंडळ आणि मार्गदर्शन समितीने केले आहे.