Tuesday, May 5, 2026
HomeBlogमहापौरांचा फुले मार्केटमध्ये धडक दौरा; अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

महापौरांचा फुले मार्केटमध्ये धडक दौरा; अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

महापौरांचा फुले मार्केटमध्ये धडक दौरा; अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
पुतळा परिसर मोकळा करण्याचे निर्देश; उद्यापासून मोहीम सुरू

जळगाव : शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी (दि. ५ मे) प्रत्यक्ष पाहणी केली. व्यापारी असोसिएशनकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी उपमहापौर व अधिकाऱ्यांसह मार्केटला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पाहणीदरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याभोवती झालेली अतिक्रमणे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सर्व पुतळे अतिक्रमणमुक्त असावेत, तरीही येथे अतिक्रमण कसे?” असा सवाल करत त्यांनी पुतळा परिसर तातडीने मोकळा करण्याचे निर्देश दिले. सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमणांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत, आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्त घेऊन कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

या कारवाईत अनधिकृत वायरिंग तात्काळ तोडण्यात येणार असून, अवैधरित्या उभारलेल्या ताडपत्री व ग्रीन शेडनेट हटवण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावर ठेवलेल्या जड-अवजड पेट्याही हटवण्याचे निर्देश देण्यात आले. विनापरवाना हॉकर्सना जागा देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही महापौरांनी दिला.

मार्केटमध्ये सध्या नोंदणीकृत हॉकर्सपेक्षा प्रत्यक्ष संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच बंद असलेले सार्वजनिक शौचालय सुरू करून स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून सकाळी घंटागाडीमार्फत कचरा संकलनाचे नियोजन केले जाणार आहे.

नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग जागा मोकळी ठेवण्यास सांगण्यात आले असून, पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचेही आश्वासन देण्यात आले. काही नागरिकांनी हॉकर्सना जागा देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्याने, पुराव्यासह तक्रार सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले.

महापौर दीपमाला काळे यांच्या या धडक कारवाईमुळे फुले मार्केट परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या