थलपतीचा ‘सुपरहिट’ राज्याभिषेक!
चेन्नई विशेष प्रतिनिधी तामिळनाडूच्या राजकारणाने आजवर अनेक ‘कट-आऊट्स’ पाहिले, अनेक महानायकांना डोक्यावर घेतले, पण गुरुवारी चेन्नईच्या इंडोअर स्टेडियमवर जो सोहळा रंगणार आहे, तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद करणारा ठरेल. ज्याला पडद्यावर ‘थलपती’ (सेनापती) म्हणून चाहत्यांनी पुजले, तो विजय आता खऱ्या अर्थाने तामिळनाडूचा ‘नायक’ झाला आहे. रजनीकांत यांना जे जमले नाही आणि कमल हसन यांना जे पेलवले नाही, ते अवघ्या ५१ वर्षांच्या या अभिनेत्याने करून दाखवले. प्रस्थापित राजकारणाचे बुरुज ढासळून एका नव्या राजकीय संस्कृतीचा उदय झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तामिळनाडूच्या विधानसभेत १०८ जागा जिंकून विजय थलपती यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने केवळ आकड्यांचे गणित जुळवले नाही, तर स्टॅलिन यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला धूळ चारून ‘जनता हीच सुपरस्टार’ असल्याचे सिद्ध केले. स्टॅलिन यांचा स्वतःचा पराभव ही डीएमकेसाठी केवळ धोक्याची घंटा नसून, घराणेशाहीच्या राजकारणाला जनतेने नाकारल्याचे स्पष्ट चिन्ह आहे. विशेष म्हणजे, हा विजय मिळवताना विजय यांनी निवडलेला मार्ग महत्त्वाचा आहे. त्यांनी तिकीट वाटपात श्रीमंती न बघता सर्वसामान्य कार्यकर्त्याला, अगदी एका ड्रायव्हरच्या मुलालाही विधानसभेची पायरी चढण्याची संधी दिली.
विजय यांचा हा प्रवास फुलांच्या पायघड्यांचा नव्हता. २०१३ चा तो काळ आठवा, जेव्हा त्यांच्या एका चित्रपटासाठी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवले होते. तो अपमान विजय यांनी गिळला, पण विसरले नाहीत. नियतीचा न्याय बघा, ज्या मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली होती, आज त्याच खुर्चीवर बसण्यासाठी देशातील दिग्गज नेते विजय यांच्या भेटीसाठी रांगा लावत आहेत. अपमानाचे रूपांतर आत्मविश्वासात कसे करावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
आता आव्हाने मोठी आहेत. एम.जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्यासारखी लोकप्रियता मिळवणे सोपे असले, तरी ती टिकवणे कठीण असते. महिलांना दरमहा २५०० रुपये, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि हिंदू-मुस्लिम वादाला फाटा देणारी भूमिका, या त्रिसूत्रीवर त्यांनी निवडणूक जिंकली आहे. मात्र, तिजोरीची स्थिती आणि प्रशासकीय गुंतागुंत हाताळताना या सुपरस्टारची खरी कसोटी लागेल. तामिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार मुख्यमंत्री होण्याची परंपरा जुनी असली, तरी विजय यांच्या रूपाने मिळालेला ‘दलित चेहरा’ आणि सामाजिक न्यायाची नवी भूमिका ही राज्याला प्रगतीकडे नेणारी ठरो, हीच अपेक्षा.
एका नव्या ‘सुर्याचा’ उदय झाला आहे; आता पाहूया तो तामिळनाडूच्या नशिबाचे सोने कसा करतो!
