Tuesday, May 5, 2026
HomeBlogगोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर

गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर

गोपनीय अंमलदारांची विशेष बैठक; कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘इंटेलिजन्स’ मजबूत करण्यावर भर
एसपींच्या मार्गदर्शनाखाली सण-उत्सव, संवेदनशील गावांचा सखोल आढावा

जळगाव जिल्हा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दलातील गोपनीय शाखेच्या अंमलदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत अंमलदारांचे मनोबल वाढवण्यासोबतच त्यांच्या कामातील अचूकता वाढवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः संवेदनशील गावे, संभाव्य जातीय तणाव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. छत्रपती संभाजी महाराज जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, महाराणा प्रताप जयंती तसेच ईद यांसारख्या सणांदरम्यान निघणाऱ्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय, जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, विविध प्रकारचे गुन्हे, यात्रा, इराणी गँग्सच्या हालचाली, गांजा लागवड, गोवंश तस्करी, अवैध पुतळे उभारणी आणि तडीपार गुन्हेगार या मुद्द्यांचा पोलीस स्टेशननिहाय आढावा घेण्यात आला.

पोलीस अधीक्षकांनी ‘इंटेलिजन्स नेटवर्क’ अधिक सक्षम करण्यासाठी अंमलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. अचूक व वेळेवर माहिती मिळवण्यासाठी विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन करत HUMINT (खबरीमार्फत माहिती), OSINT (सार्वजनिक माध्यमे), CYBINT (सोशल मीडिया), कम्युनिटी इंटेलिजन्स, टेक्निकल आणि फॉरेन्सिक इंटेलिजन्स यांसारख्या माहिती संकलनाच्या तंत्रांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला.

यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, पोलीस अधीक्षक आणि गोपनीय अंमलदार यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी ‘एसपी टू डायरेक्ट अंमलदार’ बैठक दर महिन्याला आयोजित केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या बैठकीमुळे गोपनीय अंमलदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दल अधिक सज्ज आणि सक्षमपणे कायदा-सुव्यवस्था राखेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या