नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत राहतील
अशोक जैन यांनी व्यक्त केला शोक; शेती, माती आणि शेतकऱ्यांशी नानांचे होते जिव्हाळ्याचे नाते
जळगाव, प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. नानांच्या जाण्याने केवळ एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकारच नव्हे, तर माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

नाना पाटेकर आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन हिल्समधील स्नेहाच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्स येथे आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर आणि श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांची भेट झाली होती.
या भेटीत शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये मनमोकळा आणि सविस्तर संवाद झाला. हा संवाद केवळ औपचारिक नव्हता, तर मातीशी मनापासून नाते असलेल्या दोन संवेदनशील व्यक्तींमधील जिव्हाळ्याचा संवाद होता, अशी आठवण अशोक जैन यांनी सांगितली.
जैन हिल्स येथील शेती संशोधन केंद्राला भेट देताना नाना पाटेकर यांनी विविध शेती प्रयोगांची उत्सुकतेने माहिती घेतली. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या आंब्याच्या रोपांबाबतही त्यांनी विशेष आस्था दाखवली. आपल्या फार्म हाऊससाठी आंब्याची रोपे देण्याची मागणी त्यांनी श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांच्याकडे केली होती. त्यानंतर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची रोपे त्यांच्या फार्म हाऊसवर पाठविण्यात आली.
ही रोपे नानांनी केवळ लावली नाहीत, तर ती तितक्याच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने जोपासली. त्यामुळे नाना पाटेकर, श्रद्धेय मोठेभाऊ, जैन परिवार आणि जैन हिल्स यांच्यात निर्माण झालेला स्नेहाचा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीशी जोडला गेला.
नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरी जैन हिल्सच्या मातीत त्यांनी जपलेल्या या नात्याच्या आणि आठवणींच्या खुणा कायम राहतील. त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची, शेतीविषयीच्या आस्थेची आणि माणुसकीच्या नात्याची आठवण सदैव जिवंत राहील. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, अशा भावना अशोक जैन यांनी व्यक्त केल्या.
