गिरीश महाजन, गुलाबराव पाटील , संजय सावकारे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
जळगाव / नागपूर प्रतिनिधी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर येथे राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यात जळगाव जिल्ह्यातून भाजपाचे जेष्ठ नेते गिरीश महाजन आणि भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या तीन नेत्यांना कोणते खाते देण्यात येईल हे अद्याप गुलदस्तात असले तरी जिल्ह्याच्या विकासाकरिता तीन कॅबिनेट मंत्री लाभल्याने जिल्ह्याचा विकास हा वेगाने होईल.
जामनेर विधानसभा मतदारसंघातून सातव्यांदा विजयी झालेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. तसेच ते भाजपचे संकट मोचक मंत्री म्हणून ओळखले जातात. गिरीश महाजन यांनी या अगोदर जलसंपदा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नाशिकचे पालकमंत्री यास अन्य खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या कारभार पाहिला आहे. त्यांना आणखी एखादे महत्त्वाचे जबाबदारीचे खाते मिळेल असे राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते व खानदेश मुलुख मैदान तोफ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील यांना देखील पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली असून ते या अगोदर पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे. त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून कोणते खाते मिळते हे अद्याप कळले नसले तरी त्यांना एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.
भुसावळचे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय सावकारे यांची भाजपने कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली असल्याने त्यांच्या रूपाने भुसावळ शहरासह जळगाव जिल्हाचा विकास मार्गी लागेल. दरम्यान पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक असे तीन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याला मिळाले आहेत.
राष्ट्रवादीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल पाटील यांचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नसला तरी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच जळगाव शहरातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार राजू मामा भोळे यांनी हॅट्रिक साधली असून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना राज्य मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.