235 जागांवर मिळविला महायुतीने विजय ,महाविकास आघाडीचा सुपडा साफ
मविआला विरोधी पक्ष नेतेपदासाठी लागणारे संख्याबळ आले नाही गाठता
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार
मुंबई विशेष प्रतिनिधी- राज्यात लाडक्या बहिणींसाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज बिलात माफी, एसटी प्रवासात सवलत अशा विविध योजना राबवून महायुतीला 288 पैकी 235 जागांवर विजय संपादन करता आला. तर महा विकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले असून विरोधी पक्ष नेते पदासाठी लागणारे संख्याबळ देखील आघाडीतील पक्षांना गाठता आले नाही. सोमवारी शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
23 नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालामध्ये भाजपला 132 1, सेनेला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या यात रासप 1, जनसुराज्य पक्ष 2, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष एक राजश्री शाहू आघाडी एक अशा एकूण 235 जागांचे बहुमत प्राप्त झाले आहे. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेसला 16 उद्धव ठाकरे गटाला 20 आणि शरदचंद्र पवार गटाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले असून खरी राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच ठरली असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महायुती मधील मोठा भाऊ हा भाजपच ठरला आहे.
महायुतीतील सर्व मंत्री विजयी
महायुती मधील सर्व मंत्री मोठ्या फरकाने विजयी झाले असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील ,धनंजय मुंडे ,अनिल पाटील ,दिलीप वळसे पाटील ,सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील ,अतुल सावे ,मंगल प्रभात लोढा, छगन भुजबळ ,दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील ,शंभूराजे देसाई आदी नेत्यांचा यात समावेश आहे.