Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हामहाराष्ट्रात दैदिप्यमान यशाने महायुतीच्या एकजुटीचा विजय - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात दैदिप्यमान यशाने महायुतीच्या एकजुटीचा विजय – देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था आजच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याचे स्पष्ट झाले. मतदारांनी मोदींचा ‘एक है तो सेफ है’चा नारा यशस्वी केला. हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असून, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक आहोत, अशा शब्दांत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या दैदिप्यमान विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा मोठा विजय झाला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत महायुतीने सर्वाधिक २३३ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ५१ जागांवर विजय मिळवता आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर आनंद व्यक्त करताना हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, विरोधकांनी राज्यात फेक नरेटिव्ह तयार केला होता. या नरेटिव्हचा यशस्वी सामना करणाऱ्या आमच्या राष्ट्रीय विचारांच्या विविध संघटनांचा हा विजय आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण याविरोधात आमच्या विविध पंथांच्या संतांनी जनजागृती केली. हा त्यांचा विजय आहे. खेड्यापाड्यात गावोगावी जाऊन पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह सर्वच नेत्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. या विजयामध्ये सर्वांचा हातभार आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. याहून जास्त काही बोलताच येत नाही. हे प्रेम देणाऱ्या जनतेपुढे आम्ही अक्षरशः साष्टांग दंडवत घालतो. राज्यात झालेल्या विखारी प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. आम्ही आधूनिक अभिमन्यू आहोत. आम्ही विरोधकांचा चक्रव्यूह यशस्वीपणे भेदून दाखवला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या पाठिशी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षांचा सन्मान केला जाईल
कोणत्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या निवडून येणाऱ्या आमदारांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो ते ज्या योग्य गोष्टी सांगतील, त्यांना आम्ही प्रतिसाद देऊ, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीसांनी यावेळी विरोधकांनी ईव्हीएमवर व्यक्त केलेला संशयही फेटाळला.

झारखंडमध्ये झामुमोचा विजय झाला. विरोधक तिथे लोकशाहीचा विजय झाल्याचा दावा करतात. पण महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर लोकशाही संकटात सापडली आहे, ईव्हीएमशी छेडछाड झाली आहे असे आरोप सुरू आहेत. विरोधकांनी आता आत्मचिंतन करावे. मी त्यांना सल्ला देणार नाही. मी फार छोटा व्यक्ती आहे. पण कधीतरी खरी कारणे काय आहेत याचा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.

हीच लोकशाहीची खरी गंमत
या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांनी यावरही भाष्य केले. लोकशाहीची हीच खरी गमंत आहे. लोकशाहीमध्ये जनता कुणाला डोक्यावर घेईल व कुणाला पाडेल हे सांगता येत नाही. या निवडणुकीने हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्रितपणे
फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्रपदाच्या उमेदवारावरही भाष्य केले. आमच्यात मुख्यमंत्रीपदावर कोणताही वाद होणार नाही. अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपद हे कोणत्याही निकषावर नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन घेतील. या प्रकरणी एकनाथ शिंदे, अजित पवार व आमच्या पक्षाचे नेते जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या