Friday, June 13, 2025
Homeताज्या बातम्यालाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले !

लाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले !

शासनाची कोणतीही योजना बंद होणार नाही ;  अधिवेशन झाल्यानंतर मिळेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता

नागपूर: निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाची एकही योजना बंद होणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही आहे आणि उद्याही राहील. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या जनतेला दिला. ईव्हीएमवरून संविधानिक संस्थाविरुद्ध लोकांमध्ये जनमत तयार करणे हाच खरा राजद्रोह आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस विधानसभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. त्याच मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेनेने (ठाकरे) विधिमंडळ परिसरात अनेक दिवस निदर्शने केली. सभागृहातही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला तर ‘जनतेचा कौल’, ‘लोकशाहीचा विजय’ आणि निकाल विरोधात गेला तर ‘लोकशाहीचा खून’, ‘ईव्हीएम घोटाळा’ असे बोलले जाते. जे संविधान आपण हातात घेऊन फिरतो, त्याचा विश्वासघात तुम्ही करत आहात. एकप्रकारे संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्या, त्यावर
अविश्वास व्यक्त केला जात आहे. संविधानिक संस्थांविरोधात लोकांमध्ये जनमत तयार करणे हाच खरा राजद्रोह आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. काही मतदारसंघांत उमेदवारांना समसमान मते पडणे हे पहिल्यांदाच घडलेले नाही. २०१२ पासून अनेकदा असे घडले आहे. २०१४ च्या निवडणुकीतही अनेक उमेदवारांना समान मते पडली आहेत. आपल्या मनाचे समाधान करून घेण्यासाठी असे आरोप केले जातात.

महाराष्ट्रात १ जुलै २०२२ पासून ३ लाख ४८ हजार ७० कोटींची गुंतवणूक आली असून त्यामुळे २ लाख १३ हजार २६७ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात १० मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली असून त्यामध्ये २ लाख ३९ हजार ११७ कोटींची गुंतवणूक, तर ७९ हजार ७२० इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील ४७ मोठ्या प्रकल्पांत १ लाख २३ हजार ९३१ कोटींची गुंतवणूक होऊन ६१ हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात ३८ प्रकल्पांत ७४ हजार ६४६ कोटी गुंतवणूक व ४१ हजार ३२५ रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात १३६ प्रकल्पांत १ लाख ४९ हजार ४९३ कोटींची गुंतवणूक होऊन १ लाख १० हजार ५८८ रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र

थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्याक्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणीदेखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही, तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, हेही त्यांनी सांगितले.

पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठे असून या बंदरामुळे अनेक फायदे होणार आहेत. राज्याच्या आणि देशाच्या विकासात वाढवण बंदराचे मोठे योगदान राहणार असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी गेल्या अडीच वर्षांत १६७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प त्यासाठी उपयुक्त आहेत. मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होईल. मुंबईत मेट्रो टप्पा ३ चे काम अंतिम टप्यात असून बीकेसी ते कुलाबा हा मार्ग मे २०२५पर्यंत खुला होईल, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यात २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ६६७ मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे. आपल्याकडे आज ९ लाख कृषीपंप उपलब्ध आहेत. ‘मागेल त्याला सौरपंप’ योजनेतून शेतकऱ्याला ३ महिन्यांत जोडणी देऊ. २०३० साली राज्यात ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल. नाशिक येथे आयटी पार्क विकसित करण्यात येत असून याकामासाठी वास्तुविशारदाची नेमणूक झाली आहे. राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून राज्याला विकासात प्रथम क्रमाकांवर कायम ठेवू, असे आवाहन फडणवीस यांनी केले. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

ताज्या बातम्या