जळगावच्या तिघांना २२ गावठी कट्ट्यांसह केले जेरबंद
खरगोन पोलिसांची कारवाई
खरगोन वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातून गावठी कट्ट्याचा साठा विक्री करिता नेणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना खरगोन पोलिसांनी अटक केली असून तिघांकडून पोलिसांनी २२ गावठी कट्टे हस्तगत केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार खरगोन बी. एल. मंडलोई (एसएचओ कोतवाली खरगोन) यांच्या पथकाने राजश्री जीनिंगसमोर ट्रीपलसीट महाराष्ट्राच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयितांची दुचाकी (एमएच १९, एटी ४२८६) अडविली. त्यावर असलेला संशयित शुभम सुनील जाधव (वय २१, रा. कांचननगर, जळगाव), कार्तिक ऊर्फ चेतन श्यामकांत गलोर (२१. नेताजी पालकर चौक, चाळीसगाव), पवन किशोर चव्हाण (२५, रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. दौडखेडी, खरगोन) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, दुचाकीचालक शुभम जाधवच्या पाठीवरील पिशवीमध्ये १२ बोरचे पाच गावठी पिस्तूल आढळले, तर चेतन गलोरजवळ प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले सात पिस्तूल आणि चव्हाणच्या पाठीवरील पिशवीत तीन पिस्तूल आणि बांधलेल्या पोत्यांमध्ये सात पिस्तूल आढळून आली .
मध्य प्रदेश पोलिसांनी संशयितांना बोलते केले असता त्यांनी ही सर्व शस्त्रे दौतखाडी (जि. खरगोन) येथील अंकुश ऊर्फ कुश राठोड यांच्याकडून खरेदी केली आणि ती जळगावला विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिल्ली, जळगावमध्ये नेमक्या कोणासाठी शस्त्रे खरेदी केली किंवा कोणी ही शस्त्रे मागविली होती. याबाबत फुठलीच माहिती संशयितांनी दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान संशयित हे अट्टल गुन्हेगार असल्याचे कळते .