घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल ; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू
जळगाव :-एमआयएम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरावर अज्ञात तीन जणांनी येऊन पिस्तुलातून तीन राउंड फायर केल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरातील मेहरून परिसरातील शेरा चौक भागात घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती कळतात पोलिसांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. दरम्यान बोदवड येथील एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या २ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केले. खिडकीला गोळी लागल्याने त्यांना घडलेला प्रकार समजला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहचला आहे. पुढील तपास सुरू आहे.