Saturday, June 14, 2025
Homeताज्या बातम्याराज्यातील ४१३६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

राज्यातील ४१३६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

मुंबई (वृत्तसंस्था)राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.

आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सज्जता केली आहे. मात्र, मतदानाच्या काही तास अगोदर राज्यात घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटना आणि मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे घडलेले प्रकार लक्षात घेता निवडणूक आयोगासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.

दरम्यान, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्या महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासह छोट्या-मोठ्या पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

प्रदेशनिहाय जागा –
पश्चिम महाराष्ट्र – 70 जागा
विदर्भ – 62
मराठवाडा – 46
कोकण ठाणे – 39
मुंबई – 36
उत्तर महाराष्ट्र – 35

एकूण जागा – 288
एकूण उमेदवार – 4136
एकूण मतदार 9,70,25,119

ताज्या बातम्या