पुणे : उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. सोमवारीही राज्यात सर्वात नीचांकी तापमान अहिल्यानगर येथे ५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंड वाऱ्यांमुळे अनेक शहरांच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्हे गारठले आहेत. सोमवारी अनेक भागांत १ ते ३ अंशांनी किमान तापमानात घट झाली आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तसेच विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट आहे.
राज्यात सोमवारी हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. १७ व १८ डिसेंबर रोजी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे, तर १९ डिसेंबरपासून पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.