Friday, June 13, 2025
Homeदेश विदेशपुष्पा-२' च्या निर्मात्यांकडून पीडित कुटुंबास २ कोटींची मदत

पुष्पा-२’ च्या निर्मात्यांकडून पीडित कुटुंबास २ कोटींची मदत

हैदराबाद( वृत्तसंस्था):- तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा-२’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चेंगराचेंगरीतील पीडित महिलेच्या कुटुंबाला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा बुधवारी केली. ‘पुष्पा-२’च्या विशेष स्क्रीनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. यानंतर अल्लू अर्जुनसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून अल्लू अर्जुनने १ कोटी आणि पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार व मैत्रेयी प्रोडक्शन हाऊसने ५०-५० लाख रुपये दिले आहेत. तेलंगणा राज्य चित्रपट विकास प्राधिकरणचे अध्यक्ष दिल राजू हे आर्थिक मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला देतील, अशी माहिती अल्लू अर्जुनचे वडील व प्रसिद्ध निमति अल्लू अरविंद यांनी दिली. के आयएमएस रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी मुलाच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अल्लू अरविंद, दिल राजू व अन्य लोकांनी रुग्णालयात जाऊन मुलाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याचे अरविंद यांनी सांगितले. तर तेलंगणा सरकार व अभिनेत्याकडून आपल्याला मदत मिळत असल्याचे पीडित महिलेच्या पतीने म्हटले. दरम्यान, सरकार व चित्रपटसृष्टीतील संबंधांना चालना देण्यासाठी चित्रपटातील दिग्गजांचे एक शिष्टमंडळ आज गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेणार असल्याची माहिती दिल राजू यांनी दिली.

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला ४ डिसेंबरच्या रात्री उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी संध्या चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी धावपळ उडाल्याने ३५ वर्षीय रेवती नामक महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा ८ वर्षीय श्री तेजा नामक मुलगा जखमी झाला होता. पीडित महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्यासह त्याची सुरक्षा टीम व चित्रपटगृह व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर १३ डिस् ोंबर रोजी महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. पण तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता.

ताज्या बातम्या