गॅसचा कृत्रिम तुटवडा; ९५० रुपयांचा सिलिंडर दीड ते दोन हजारांना
रिक्षा भाड्यातही वाढ; जळगावकरांच्या खिशाला दुहेरी फटका
जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. अधिकृतपणे सुमारे ९५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर काळाबाजारातून तब्बल १५०० ते २००० रुपयांना विकला जात असल्याचे बोलले जात आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांची उघडपणे लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. गॅस दरवाढ आणि टंचाईचे कारण देत रिक्षा चालकांनी भाड्यात वाढ केली आहे. टॉवर चौक किंवा जुन्या बसस्थानक परिसरातून प्रवास करण्यासाठी पूर्वीपेक्षा २० ते ३० रुपये अधिक आकारले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. कोरोनानंतर ही दुसरी मोठी भाडेवाढ असल्याचेही बोलले जात आहे.
काळाबाजाराचे जाळे वाढले
एकीकडे अधिकृत वितरणासाठी गॅस नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे दुप्पट पैसे मोजल्यास तात्काळ सिलिंडर मिळत असल्याचे चित्र आहे. हॉटेल व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. गॅस एजन्सींमधील काही कर्मचारी आणि एजंट यांच्या संगनमताने हा काळाबाजार फोफावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. एजन्सींच्या साठ्याची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ऐन महागाईच्या काळात गॅससाठी दोन ते अडीच पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याने जळगावकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस पंपांवर रिक्षांची गर्दी
दरम्यान, शहरातील तांबापूर आणि अजिंठा चौफुली परिसरातील गॅस पंपांवर गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण एजन्सी किंवा गॅस पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
हातगाड्यांवर घरगुती गॅसचा वापर; कारवाई नाही
शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या चर्चा सुरू असतानाच हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने गॅस कंपन्या, पुरवठा विभाग आणि पोलिसांचा समावेश असलेली पथके नेमल्याचे जाहीर केले असले, तरी दोनचार दिवसांत एकही कारवाई झालेली नसल्याचे चित्र आहे.
भजे गल्ली, जुने व नवीन बसस्थानक परिसर, गोलाणी मार्केट तसेच मू. जे. महाविद्यालय परिसरात अनेक हातगाड्यांवर घरगुती सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पॅनिक बुकिंगमुळे सलग दुसऱ्या दिवशीही टेलिफोनिक बुकिंग बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
काळाबाजाराबाबत तक्रार करण्यासाठी मदत क्रमांक जाहीर
प्रशासनाने गॅसच्या काळाबाजाराबाबत तक्रार करण्यासाठी ०२५७-२२२३१८० हा मदत क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, या क्रमांकावर गॅस कधी मिळणार, बुकिंग का होत नाही अशा चौकशीचे फोन अधिक येत असल्याने कर्मचारीही हतबल झाले आहेत.दरम्यान, जिल्ह्यात सुमारे १२ लाखांहून अधिक गॅस ग्राहक असून दररोज सुमारे २५ हजार सिलिंडरचा वापर होतो. त्यात २० हजारांहून अधिक घरगुती आणि सुमारे साडेतीन हजार व्यावसायिक सिलिंडरचा समावेश आहे. लवकरच सुमारे १४ हजारांहून अधिक सिलिंडरचा पुरवठा जिल्ह्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
“जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांना बळी पडू नये. काळाबाजार किंवा साठेबाजीबाबत माहिती असल्यास प्रशासनाला कळवावे.”
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव
