जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये घबराट
मध्य प्रदेशातील भागलपूर-खरगोन परिसरात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप; जळगाव, भुसावळ, रावेरसह अनेक भागांत हादरे
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात आज, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १५ ते १६ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जळगाव शहरासह भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरातही हे हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमीन हादरल्याचे जाणवताच अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भागलपूर-खरगोन परिसरात सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा सौम्य प्रभाव जळगाव जिल्ह्यातील विविध भागांत जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांची घराबाहेर धाव
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे धक्के सुमारे अर्धा मिनिट जाणवत होते. विशेषतः भुसावळ आणि वरणगाव परिसरात हादरे जाणवल्याचे सांगण्यात आले. सकाळच्या वेळी अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेक जणांनी एकमेकांना फोन करून सुरक्षिततेची विचारपूस केली.
प्रशासनाकडून दुजोरा; जीवितहानीचे वृत्त नाही
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचा केंद्रबिंदू, त्याची नेमकी तीव्रता आणि जिल्ह्यातील विविध भागांतील परिणाम याबाबतच्या अधिकृत तांत्रिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाकडून पुढील माहिती मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
