Friday, November 20, 2026
Homeक्राईमजळगाव व यावल ग्रामीण रुग्णालयात १७.७२ कोटींच्या साहित्य खरेदीत  घोटाळा; सात जणांविरुद्ध...

जळगाव व यावल ग्रामीण रुग्णालयात १७.७२ कोटींच्या साहित्य खरेदीत  घोटाळा; सात जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव व यावल ग्रामीण रुग्णालयात १७.७२ कोटींच्या साहित्य खरेदीत  घोटाळा; सात जणांविरुद्ध गुन्हा

एकाच संस्थेला नियम डावलून कंत्राट दिल्याचा आरोप; २१ रुग्णालयांसाठी १०५ वस्तूंचे आदेश, प्रत्यक्ष पुरवठ्यात मोठी तफावत

जळगाव | दिव्य भरारी न्युज नेटवर्क : कोविड महामारीच्या काळात जळगाव जिल्हा रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तब्बल १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपयांच्या दैनंदिन व किरकोळ साहित्याची नियमबाह्य खरेदी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत मागणी किंवा शासनाची पूर्वपरवानगी नसताना खरेदी प्रक्रिया राबवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागातील सहा अधिकारी-कर्मचारी आणि नाशिक येथील पुरवठादार संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील यांनी शासनातर्फे फिर्याद दिली आहे. ६ ऑक्टोबर २०२० ते २५ मे २०२२ या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिल्हाधिकारी किंवा शासनाचे आदेश नसताना तसेच आरोग्य संस्थांकडून साहित्याची मागणी प्राप्त झालेली नसताना साबण, टेबल क्लॉथ, झाडू, टॉर्चसेल, फायर एक्स्टिंग्विशर आणि सॅनिटायझर यांसारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.

नियम डावलून एकाच संस्थेला कंत्राट

खरेदी प्रक्रियेत शासनाच्या १ डिसेंबर २०१६ च्या निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. प्रादेशिक प्रमुखांना किरकोळ खरेदीसाठी केवळ एक लाख रुपयांपर्यंतचे अधिकार असताना त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

२०२० मध्ये राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत तीन संस्थांपैकी दोन संस्था तांत्रिक लिफाफ्यात अपात्र ठरल्या होत्या. नियमानुसार किमान तीन संस्था पात्र नसतानाही तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी नियमांना बगल देत नाशिक येथील मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्यादित, नांदूर, पोस्ट मांडसांगवी या संस्थेला त्यांच्या निर्धारित दराने कार्यारंभ आदेश दिल्याचा आरोप आहे.

पुरवठा आदेश आणि प्रत्यक्ष साहित्य वितरणात तफावत

संबंधित संस्थेला २१ रुग्णालयांसाठी १०५ प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या पुरवठ्यात मोठी तफावत आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे. २०२० मध्ये एरंडोल, मुक्ताईनगर आणि पारोळा येथील रुग्णालयांना केवळ सात ते आठ वस्तूंचा पुरवठा झाला. तर २०२१ मध्ये रावेर, जामनेर, यावलसह नऊ रुग्णालयांना एकूण ८५ वस्तूंचा पुरवठा झाल्याचे समोर आले आहे.

अधिकार नसताना देयके पारित

प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता नसतानाही जिल्हा रुग्णालयाच्या साहित्य खरेदीची देयके पारित करण्याचे अधिकार यावल ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबूलाल बारेला यांना नियमबाह्यपणे देण्यात आल्याचा आरोप आहे. वर्षभराहून अधिक काळ प्रलंबित असलेली देयके शासनाची पूर्वमंजुरी न घेता कोषागारातून अदा करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

व्हॅट आणि जीएसटीच्या आकारणीवरून संशय

संबंधित खरेदीच्या बिलांची तपासणी करताना जीएसटीसोबत व्हॅटची आकारणी केल्याचे आढळले. विशेष म्हणजे जुलै २०१८ नंतर व्हॅट बंद झालेला असतानाही काही बिलांमध्ये व्हॅट आकारण्यात आला होता. या बाबीमुळे संपूर्ण खरेदी व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत खरेदी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सात जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. यू. बी. तासरखेडकर, लेखा अधीक्षक हरिपाल आर. वाणी, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबूलाल बारेला, सहायक अधीक्षक सुधाकर वगड्डू चोपडे आणि मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्यादितच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत. कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेसाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरेदी आदेश, प्रत्यक्ष साहित्य पुरवठा, देयके आणि संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासातून या कथित गैरव्यवहारातील संपूर्ण साखळी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या