Friday, June 13, 2025
Homeक्राईमपिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने तरुण गंभीर जखमी, जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील...

पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने तरुण गंभीर जखमी, जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील घटना

पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने तरुण गंभीर जखमी, जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील घटना

जळगाव : शहरातील दूध फेडरेशन रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनात गोळीबार होऊन २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. नाजीम फिरोज पटेल (वय २५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांच्या पाठीत उजव्या बाजूने गोळी लागली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मित्रावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

नाजीम पटेल हे शेफ म्हणून काम करतात. १४ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते आपल्या मामा बबलू पटेल आणि मित्र तोहित देशपांडे, अल्ताफ शेख यांच्यासह कार (क्र. MH-19-Q-7514) ने भुसावळ येथील एका कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ११ वाजता कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण पाळधीला परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज नगरमार्गे दूध फेडरेशन रस्त्यावर ही घटना घडली.

वाहन बबलू पटेल चालवत होते, नाजीम त्यांच्या शेजारी होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि नाजीम यांच्या पाठीत गोळी लागली. गाडी थांबवून मागे पाहिले असता तोहित देशपांडे हा हातात बंदूक घेऊन असल्याचे दिसून आले.

जखमी नाजीम पटेल यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा तोहित देशपांडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या