बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबरला ‘स्मरण बहिणाईचे’ विशेष सोहळा
जुने जळगाव येथील बहिणाई स्मृती संग्रहालयात आयोजन; मान्यवरांचे व्याख्यान व साहित्यिक संवाद
जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) : निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुने जळगावमधील चौधरीवाडा येथील बहिणाई स्मृती संग्रहालयात हा सोहळा रंगणार आहे. बहिणाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करणे आणि त्यांच्या साहित्यिक वारशाला उजाळा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रकार तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजू बाविस्कर हे भूषवणार असून, ते ‘चित्रकार ते साहित्यकार प्रवास’ या विषयावर विचार मांडतील. तसेच, सुप्रसिद्ध कवी प्रभाकर महाजन (‘बहिणाईंचे ग्रामजीवन व त्यांची गाणी’) आणि ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे (‘लेवागणबोलीचा गोडवा’) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
बहिणाईंच्या काव्यातून खान्देशची माती, ग्रामीण लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लेवागणबोलीचा अस्सल गोडवा प्रत्ययाला येतो. त्यांचा हा साहित्यिक ठेवा केवळ खान्देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी साहित्याची समृद्ध ओळख आहे. हा अनमोल वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, ट्रस्टचे अन्य विश्वस्त, चौधरीवाड्यातील रहिवासी, साहित्यिक तसेच नूतन मराठा महाविद्यालय व अनुभूती-२ शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
खान्देशच्या या साहित्यिक-सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्यासाठी आणि बहिणाईंच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि समन्वयक अशोक चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
