Wednesday, November 19, 2025
Homeक्राईमशिरपूर बायपासवर रस्ता लुटीचा कट उधळला : सात जणांना अटक

शिरपूर बायपासवर रस्ता लुटीचा कट उधळला : सात जणांना अटक

शिरपूर बायपासवर रस्ता लुटीचा कट उधळला : सात जणांना अटक
१३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त ; चोपडा शहर पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

चोपडा शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत शिरपूर बायपासवर रस्ता लुटीसाठी थांबलेल्या सात संशयितांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टे, तलवारी, मोबाईल, रोकड व कार असा एकूण ₹१३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) मध्यरात्री साडेअडीचच्या सुमारास चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाला शिरपूर बायपास रोडवर पांढरी कार (एमएच २६ सीएच १७३३) संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, कारजवळ दोन जण लक्ष ठेवून उभे होते, तर पाच जण आत बसलेले होते. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच घेराव घालून सातही संशयितांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता, दोघांकडून लोड केलेले गावठी कट्टे, तर कारमधून दोन तलवारी आणि रिकामे मॅगझिन आढळले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये –
दिलीपसिंह हरिसिंध पवार (३२, नाथनगर, नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नवामोडा, नांदेड), अमनदीपसिंह अवतारसिंह राठोड (२५, मगनपुरा, नांदेड), सद्दाम हुसेन मोहंमद अमीन (३३, इतवारा रोड, नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०, भावसार गल्ली, चोपडा) आणि जयेश राजेंद्र महाजन (३०, भाट गल्ली, चोपडा) यांचा समावेश आहे.

चौकशीत उघड झाले की, या टोळीतील काही जणांवर खून, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे व बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद नांदेड, वैजापूर आणि चोपडा येथे आहे. दिलीपसिंह पवार व अनिकेत सूर्यवंशी यांच्यावर नांदेड येथे ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई झाली होती. दोघेही अलीकडेच कारागृहातून बाहेर आले असून, त्यांनी जळगाव जिल्ह्यात मोठ्या दरोड्याची योजना आखली होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. टोळीने नांदेड येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला विवस्त्र अवस्थेत बांधून ठेवले, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. संबंधित प्रकरणात नांदेड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अमोल पवार, मदन पावरा, रवींद्र मेढे आणि विनोद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.

ताज्या बातम्या