शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमिन प्रदान
जळगाव– जम्मू-काश्मीरमध्ये २७ फेब्रुवारी २००० रोजी झालेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ दरम्यान शौर्याने लढत वीरमरण प्राप्त झालेल्या जवान राकेश काशिराम शिंदे (रा. कुर्हे पानाचे, ता. भुसावळ) यांच्या मातोश्री अनुसयाबाई काशिनाथ शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मांडवेदिगर (ता. भुसावळ) येथे २ हेक्टर शेतीयोग्य कृषी जमीन प्रदान करण्यात आली.
या प्रेरणादायी प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते अधिकृत जमीन प्रदान आदेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहीद जवानांच्या कुटुंबासाठी शासन सदैव कृतज्ञ असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, “ही केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या देशसेवेच्या त्यागाला कृतज्ञतेची भावांजली आहे.”
या वेळी भावना व्यक्त करताना वीरमाता अनुसयाबाई शिंदे म्हणाल्या, “माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, पण शासनाने त्याच्या बलिदानाची दखल घेतल्याचा अभिमान वाटतो. ही जमीन आम्हाला त्याच्या आठवणी जपण्यासाठी एक नवसंजीवनी ठरेल.”
कार्यक्रमाला तालुका प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.