गुजरातच्या समुद्रात जहाजातून ११५० कोटींचे कोकेन जप्त
अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि तटरक्षक दलाने एका मोठ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असून, मुंद्रा बंदराजवळील एका जहाजातून सुमारे १,१५० कोटी रुपये किमतीचे ११५ किलो कोकेन जप्त केले. याप्रकरणी तीन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली
आहे. युरोप नामक मालवाहू जहाजात हे अमली पदार्थ आढळले. मुंद्रा बंदराच्या समुद्रात नांगर टाकण्यापूर्वी हे जहाज लॅटिन अमेरिका, मेक्सिको, अमेरिका आणि कराची येथून आले होते, अशी माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक के. एल.एन. राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अमली पदार्थांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने संयुक्त मोहीम आखत २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास या जहाजाची
झडती घेतली. कारवाईदरम्यान जहाजावरील दोन कर्मचाऱ्यांनी कथितरीत्या अनेक जड पिशव्या समुद्रात फेकल्या. त्यांपैकी हस्तगत करण्यात आलेल्या पाच पिशव्यांमधून अंदाजे ११५ किलोग्रॅम कोकेन हाती लागले. याप्रकरणी जुमा नासिर ओमर नावाच्या एका टांझानियन नागरिकाला जहाजातून अटक करण्यात आली.
तर गुजरात एटीएसने दिल्ली पोलिसांच्या मदतीने राजधानीच्या द्वारका परिसरातून इतर दोन परदेशी नागरिकांना अटक केली. हे दोघे हा माल स्वीकारणार होते. कारवाईदरम्यान समुद्रात उडी मारलेल्या आणखी एका संशयित टांझानियन नागरिकाचा शोध सुरू आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थांचा हा साठा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्राझीलमध्ये जहाजावर चढवण्यात आला होता आणि जहाजावरील इतर कर्मचाऱ्यांच्या नकळत मोटर रूममध्ये गुप्तपणे लपवून ठेवण्यात आला होता. कोकेन असलेल्या बॅगांमधून जीपीएस उपकरणे, सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणे आणि एअरटॅग्ज देखील जप्त करण्यात आले आहेत. यावरून वाहतुकीदरम्यान या अमली पदार्थांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाळत ठेवली जात होती, हे स्पष्ट होते.