पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील पेट्रोल पंपावर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते.
यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पुरवठा विभाग तसेच आयओसीएल (IOCL), बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL), नायरा (Nayara) आणि रिलायन्स (Reliance) या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळची जी स्टॉक पोझिशन आहे ती १९९० किलोलिटरची स्टॉक पोझिशन आपल्याकडे डिझेलच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलच्या साठ्यामध्ये काहीही कमतरता नाही आहे आणि पेट्रोल बाबत पॅनिक सुद्धा नाही आहे. पॅनिक हे आपल्या काही ठिकाणी डिझेलच्या बाबतच होते. तर १९९० केएल (KL) ची आपल्याकडे सप्लाय आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्या येथे १५५० केएल च्या आसपास मागणी आहे आणि ट्रान्झिटमध्ये जो येणारा साठा आहे, आपल्याकडे १७६० किलोलिटरचा जो साठा आहे तो ट्रान्झिटमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या चार दिवसांच्या तुलनेत एका दिवसातच मोठ्या प्रमाणावर डिझेलची विक्री होत असल्याने काही ठिकाणी पुरवठ्यावर ताण जाणवत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील साठा पर्याप्त असून येणारा पुरवठादेखील मुबलक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, पॅनिक बायिंग करू नये, खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल घेऊन जाणे टाळावे. अत्यावश्यक परिस्थितीतच सुरक्षित कंटेनरचा वापर करून इंधन घ्यावे, असे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट केले. सर्व पेट्रोल पंपांवर महसूल, पुरवठा व पोलीस विभागाकडून नियमित गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लावणीच्या हंगामामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढे पेट्रोल-डिझेल पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे इंधनाचा अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नसून गरजेनुसार पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.