Tuesday, July 8, 2025
Homeअध्यात्मिकपुरीतील रथयात्रेत चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

पुरीतील रथयात्रेत चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

पुरीतील रथयात्रेत चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

दर्शन आणि रथाला स्पर्श करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने घडली घटना

पुरी (ओडिशा) – जगन्नाथ रथयात्रेच्या दिवशी पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ रविवारी पहाटे घडलेली चेंगराचेंगरीची घटना हृदयद्रावक ठरली. पहाटे ४ ते ५ दरम्यान रथाच्या स्पर्शासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या ढकलाढकलीत तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर १० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदीघोष रथाजवळ दर्शन व स्पर्शासाठी हजारो भाविक एकत्र जमले होते. गर्दीचा ताण सहन न झाल्याने नियंत्रणासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि ढकलाढकली सुरू झाली. अचानक झालेल्या या गोंधळात अनेक भाविक रथाच्या चाकाजवळ पडले. त्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, घटनास्थळी रुग्णवाहिकेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे जखमींना हातावर किंवा खांद्यावर उचलून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांची नावे बसंती साहू, प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास अशी आहेत.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे प्रशासनाच्या तयारीवर आणि गर्दी नियंत्रणाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या दुःखद घटनेमुळे रथयात्रेतील उत्सवावर शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले असून, संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या