Tuesday, July 8, 2025
Homeक्राईमजळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले ! विविध घटनेत तिघांचा मृत्यू 

जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले ! विविध घटनेत तिघांचा मृत्यू 

जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले ! विविध घटनेत तिघांचा मृत्यू 

अनेक झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडित

जळगाव, प्रतिनिधी l जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब वाकले आणि वाहतुकीसह वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला.

 

चोपडा तालुक्यातील पळासखेडा मिरा येथे प्रियानी बरेला (३४) ही आदिवासी महिला झाडाखाली आसरा घेत असताना चिंचेचे झाड तिच्यावर कोसळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत झाडाच्या आडोशाला उभे असलेले इतर १५ जण जखमी झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे पितांबर वाघ (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे नारायण पाटील (६८) यांना वादळात उडालेल्या पत्र्यांचा फटका बसून मृत्यू झाला.

दरम्यान, जळगाव शहरातील मेहरूण परिसरात वीज कोसळून संतोष तायडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

या आपत्तीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आपत्ती व्यवस्थापनाचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. महापालिका, महावितरण, वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले असून, मध्यरात्रीपर्यंत काही भागांतील वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि झाडांच्या आडोशाला न थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरुवारपासून वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, बाधित नागरिकांना मदत दिली जाणार आहे.

ताज्या बातम्या