Friday, June 13, 2025
Homeक्राईमअमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प

 मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना ; अनेक प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले ! 

अमळनेर (प्रतिनिधी) : भुसावळहून नंदुरबारकडे निघालेली मालगाडी गुरुवारी (दि. १५ मे) दुपारी दोनच्या सुमारास अमळनेरजवळील प्रताप महाविद्यालय परिसरात रुळावरून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही असून, लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरल्याने शेजारच्या रेल्वे मार्गांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अमळनेर रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरच ही दुर्घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रेल्वेचे तांत्रिक पथक व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असून, वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, यासंदर्भातील तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली असली, तरी प्राथमिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून, प्रवासी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या