चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात चार महिला ठार!
तेंदूपत्ता वेचताना वाघिणीची झडप; मृतांमध्ये जुळ्या बहिणींचा समावेश, ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप
सिंदेवाही (चंद्रपूर) : जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला. तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये जुळ्या बहिणींचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलांमध्ये कवडाबाई दादाजी मोहुर्ले (वय ३५), अनिताबाई दादाजी मोहुर्ले (वय ३५), सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३३) आणि संगीता चौधरी यांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी सात महिलांचा गट तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गुंजेवाही जंगलात गेला होता. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक महिलांवर झडप घातली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. वाघिणीने काही महिलांच्या मानेवर थेट हल्ला करत गंभीर जखमा केल्या. अचानक झालेल्या या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्या जीव वाचवण्यासाठी जंगलातून सैरावैरा पळू लागल्या. मात्र वाघिणीच्या तावडीतून चार महिलांना सुटका मिळू शकली नाही. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलांच्या अंगावर वाघाच्या नखांचे आणि दातांचे खोलवर ओरखडे स्पष्ट दिसत होते.
गुंजेवाही परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीसह तिच्या बछड्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. मात्र, तरीही प्रभावी उपाययोजना न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, मागील एका महिन्यात याच परिसरात वाघाच्या हल्ल्यात आणखी दोघांचा बळी गेला होता. २५ मार्च रोजी बळीराम पेंदाम यांचा मोहफुले वेचताना मृत्यू झाला होता, तर १३ एप्रिल रोजी वत्सला ईश्वर वाढगुरे यांचाही वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे गुंजेवाही परिसर ग्रामस्थांसाठी अक्षरशः ‘डेथ झोन’ बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, गतवर्षीही सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढामाळ जंगलात तेंदूपत्ता गोळा करताना एकाच दिवशी तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेचीच पुनरावृत्ती यंदा पुन्हा झाल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
