Wednesday, January 14, 2026
Homeखानदेशजळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचा चौकार ! ; महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचा चौकार ! ; महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचा चौकार ! ; महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांचा विजय निश्चित

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपला वरचष्मा कायम राखत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या विजयामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध जागांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. यामुळे ७५ जागांच्या या महापालिकेत महायुतीने मतदानापूर्वीच एकूण पाच जागांवर आपले झेंडे फडकवले आहेत.

जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. शेकडो उमेदवार रिंगणात असतानाच, आज २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राजकीय समीकरणे वेगाने बदलली. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत जोरदार प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला मोठे यश मिळाले आहे.

असा रंगला विजयाचा घटनाक्रम: निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात छाननी प्रक्रियेदरम्यानच प्रभाग १२ (ब) मधून भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित होऊन महायुतीने खाते उघडले होते. त्यानंतर अर्ज माघारीच्या सत्रात शिवसेनेने (शिंदे गट) धडाका लावला.

डॉ. गौरव सोनवणे (प्रभाग १८ अ): शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

मनोज चौधरी (प्रभाग ९ अ): यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने यांचा विजय सुकर झाला.

प्रतिभा देशमुख (प्रभाग ९ ब): माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

शेवटच्या दिवशी शिवसेनेची ‘मॅजिक फिगर’: आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग १९ (अ) मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे निश्चित झाली. यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) चार जागांवर, तर महायुती एकूण पाच जागांवर बिनविरोध निवडीसह आघाडीवर आहे.

निवडणुकीच्या  मतदानापूर्वीच (१५ जानेवारी) मिळालेल्या या घवघवीत यशामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आता उर्वरित ७० जागांसाठी होणाऱ्या चुरशीच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या