महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
जळगावसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता
जळगाव | प्रतिनिधी
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास काहीसा संथ राहिला. ८ जून रोजी कोकणातील हर्णे आणि सोलापूर परिसरात मान्सूनची वाटचाल थांबली होती. त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, तब्बल १६ दिवसांच्या खंडानंतर मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाअभावी खोळंबलेल्या खरीप पेरण्या आता वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ ते ७ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात २ ते ४ जुलै आणि ७ जुलै रोजी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.
जळगावला यलो अलर्ट
जळगाव जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि जिंतूर तालुक्यांत वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बुधवारी जळगाव शहरातही दुपारच्या सुमारास सुमारे १५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.