प्रतिपंढरपूर संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण
शॉर्टसर्किटमुळे लागली आग; लाकडी इमारतीचे मोठे नुकसान, मात्र मूळ मंदिर आणि मूर्ती सुरक्षित
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानला बुधवारी (१ जुलै) रात्री सुमारे सव्वाआठ वाजता भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून संस्थानच्या लाकडी इमारतीचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. सुदैवाने मूळ मंदिर आणि त्यातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती सुरक्षित राहिल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण लाकडी बांधकाम आणि ऑइल पेंटमुळे काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या बाजूस असलेल्या संत प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीतून आगीची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
१२ ते १४ अग्निशमन बंबांची मदत
घटनेची माहिती मिळताच अमळनेर, पारोळा तसेच परिसरातील अग्निशमन दलाच्या १२ ते १४ बंबांना पाचारण करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने बचाव कार्यात काही अडचणी निर्माण झाल्या. रिमझिम पावसामुळेही आग आटोक्यात आणण्यास काही प्रमाणात मदत झाली.
दिंडीचा प्रवास सुरूच राहणार
योगायोग म्हणजे, याच दिवशी दुपारी वाडी संस्थानचे गादीपुरुष संत प्रसाद महाराज हे संत सखाराम महाराजांच्या दिंडीसह पंढरपूरकडे रवाना झाले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिंडीचा प्रवास पूर्वनियोजितप्रमाणे सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
मंदिर काही दिवस दर्शनासाठी बंद
आगीत मंदिराच्या इमारतीचे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डीवायएसपी विनायक कोते यांच्यासह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनीही अग्निशमन बंब पाठवून मदतकार्याची धुरा सांभाळली.
नगरसेवक अनिल महाजन, पंकज चौधरी, बाळा संदानशिव, पंकज भोई, गोपी कासार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन विजय पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, कसाली मोहल्ला परिसरातील सुमारे ५० ते १०० मुस्लिम तरुणांनीही आग विझविण्यासाठी पुढाकार घेत मानवी एकतेचे दर्शन घडविले. त्यांच्या मदतकार्याचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
ऐतिहासिक वारसा आगीत भस्मसात
या आगीत संस्थानातील जुने लाकडी साहित्य, ऐतिहासिक दस्तऐवज आणि काही प्राचीन वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संस्थानच्या ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान झाल्याची खंत भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
