Thursday, June 4, 2026
HomeBlogमहायुतीत सर्व काही आलबेल नाही? जळगाव विधान परिषदेत बंडखोरीची ठिणगी

महायुतीत सर्व काही आलबेल नाही? जळगाव विधान परिषदेत बंडखोरीची ठिणगी

महायुतीत सर्व काही आलबेल नाही? जळगाव विधान परिषदेत बंडखोरीची ठिणगी
रेश्मा काळे मैदानात कायम; विष्णू भंगाळे यांच्या भूमिकेची चर्चा, गिरीश महाजनांसाठी प्रतिष्ठेची लढत
जळगाव | प्रतिनिधी

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना राज्याचे मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी स्वतः लक्ष घालून विविध इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विनंतीनंतर काही उमेदवारांनी माघार घेतली. मात्र, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले.

याहून अधिक चर्चेचा विषय ठरली ती शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांची भूमिका. माघारीच्या सर्व शक्यता असतानाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीच्या रणनीतीला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमागे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे तसेच महिला आघाडीच्या नेत्या संरिता माळी-कोल्हे यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरही या घडामोडींना मोठी हवा मिळाली आहे. “विष्णू भंगाळे थेट गिरीश महाजनांना नडले”, “महाराष्ट्राचे संकटमोचक आपल्या जिल्ह्यातच बिनविरोध निवडणूक घडवू शकले नाहीत”, अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे आता केवळ विधान परिषदेची निवडणूक म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची चुरस म्हणून पाहिले जात आहे.

विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात भाजपचे मजबूत नेतृत्व मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून विरोधी गटांनी निर्माण केलेल्या आव्हानामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. महायुतीतील सर्व पक्ष एकाच भूमिकेत आहेत का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या