Wednesday, April 22, 2026
Homeजळगाव जिल्हावीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्याय वापरा

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्याय वापरा

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्याय वापरा

महावितरणचे ग्राहकांना आवाहन

जळगाव : वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करण्याऐवजी वीजग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या 1912, 1800-233-3435 व 1800-212-3435 या तीनपैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा व वीजबिलासंबंधीच्या तक्रारीं नोंदवाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणची यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी 24 तास कार्यरत आहे.

राज्यात सुमारे तीन कोटी तर जळगाव परिमंडलात 17 लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तसेच त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल तयार करण्यासाठी महावितरण कायम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते. यामध्ये अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते. मात्र सद्य:स्थितीत ग्राहक ऑनलाईनपेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची जात आहे.
*वीजपुरवठा व विजेसंबंधीची तक्रार कोठे करावी ?*
विजेचे जाळे सर्वदूर पसरलेले असले तरी महावितरणची सेवा मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे सर्वांना सहज व 24 तास उपलब्ध आहे. महावितरणची सेवा केंद्रे शेकडो कर्मचाऱ्यांसह 24 तास कार्यरत आहेत. त्यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रार तात्काळ नोंदवण्यासाठी 1912, 1800-233-3435 व 1800-212-3435 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदवताना ग्राहकांनी त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक नोंदवल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. ती तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. तसेच तक्रारीची नोंद ऑनलाईन प्रणालीत झाल्यामुळे विद्युत नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वेळेत सोडवणे बंधनकारक बनते.

फोनवर केलेल्या तक्रारींची नोंद नसते

ज्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाईन प्रणालीत होते. त्याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. कारण ज्यावेळी एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा एकाच वेळी त्याला अनेक फोन येतात. प्रत्येक जण त्याचे नाव, पत्ता सांगण्यात वेळ घालवतो. तसेच फोन चालू असल्यामुळे त्याला फॉल्ट शोधता येत नाही. खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना घेतलेला कॉल त्याचा जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे वैयक्तिक फोन करणे टाळावे.

एसएमएस व मिस कॉलद्वारेही नोंदवा तक्रार
वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदवलेल्या क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरून “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाईप करून 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व तसा संदेश ग्राहकाला मिळतो.

*महावितरण संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा वापर*
महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे ॲप प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरहून डाउनलोड करावे. यामध्ये एकापेक्षा जास्त वीजजोडण्या एकदाच नोंदणी करून हाताळता येतात. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येतो.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या