Sunday, May 3, 2026
Homeक्राईमजळगाव एमआयडीसीत आगीचे तांडव; तीन कंपन्या खाक!

जळगाव एमआयडीसीत आगीचे तांडव; तीन कंपन्या खाक!

जळगाव एमआयडीसीत आगीचे तांडव; तीन कंपन्या खाक!

​भीषण स्फोटांनी परिसर हादरला; कोट्यवधींचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

​जळगाव (विशेष प्रतिनिधी): शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण करत तब्बल तीन कंपन्यांना आपल्या विळख्यात घेतले. विशेषतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एका कंपनीतील पाच गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला होता.

शॉर्टसर्किट ठरले कारण:
मिळालेल्या माहितीनुसार, जे-४० सेक्टरमध्ये दिग्विजय बनवट यांच्या मालकीची ‘नवकार चटई’ नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या शेजारीच त्यांनी उत्पादित माल ठेवण्यासाठी भाडेतत्वावर एक गोडाऊन घेतले आहे. शनिवारी दुपारी या गोडाऊनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि ठिणगी पडली. प्लास्टिकच्या चटया असल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. ही आग एवढी वेगाने पसरली की, तिने शेजारील पावडर कोटिंग करणाऱ्या कंपनीलाही वेढले.

सिलेंडर स्फोटांमुळे खळबळ:
पावडर कोटिंग कंपनीत कामासाठी वापरले जाणारे गॅस सिलेंडर आगीच्या संपर्कात आले. यावेळी एकापाठोपाठ पाच सिलेंडर्सचे स्फोट झाले. या स्फोटांचे आवाज आणि धुराचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. आग चौथ्या कंपनीपर्यंत पोहोचणार इतक्यात अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने शनिवारी कंपन्यांना सुटी असल्याने आत कामगार नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.


वाहन चालकांचे प्रसंगावधान:
ज्या ठिकाणी आग लागली होती, त्याच्या अगदी समोरच ‘भारत गॅस’ कंपनीचे मोठे सिलेंडरचे गोदाम आणि प्लांट आहे. आगीच्या ज्वाळा आकाशात उंच उठत असल्याचे पाहून आणि सिलेंडरचे आवाज ऐकताच गॅस प्लांटसमोरील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. प्लांटसमोर गॅस भरण्यासाठी ५ ते ६ मोठी वाहने उभी होती. मात्र, वाहन चालकांनी प्रसंगावधान राखत ही ज्वलनशील वाहने तात्काळ घटनास्थळापासून दूर नेली. जर ही आग गॅस प्लांटपर्यंत पोहोचली असती, तर शहरात मोठा अनर्थ ओढवला असता.


अग्निशमन दलाची तत्परता:
आगीची माहिती मिळताच जळगाव मनपाचे अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या ५ बंबांसह जैन व्हॅली, नशिराबाद, दीपनगर आणि भुसावळ नगरपालिकेच्या पथकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत ‘नवकार चटई’, ‘श्रीनिवास एंटरप्रायझेस’ आणि ‘जे ब्रदर्स’ या कंपन्यांमधील मशिनरी आणि तयार माल जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

कंपनीतील तयार व कच्चा माल आगीत सापडला. प्लास्टिक माल व त्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग शेजारी असलेल्या सोपान अटक यांच्या मालकीच्या श्रीनिवास – पॉलिमर्स कंपनीपर्यंत पोहचली. परंतू ही कंपनी आग लागलेल्या – कंपनीपासून दूर असल्यामुळे येथे लवकर आगीवर नियंत्रण – मिळविण्यात आले.

हेअर ऑईलच्या कंपनीपर्यंत पोहचली आग

जे ४० सेक्टरमधील कंपन्यांची ही आग त्यांच्या पाठीमागेच असलेल्या जे ४७ सेक्टरमधील जे ब्रदर्स या हेअर ऑईल – कंपनीपर्यंत पोहचली. आगीने या कंपनीला आपल्या विळख्यात घेत असतांना महापालिका अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तर दुसरीकडे भारत गॅस गोडावूनमधून थेट दोन पाईप जोडून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या – आगीत कंपनीचे किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती कंपनी मालक विनय जगवानी यांनी दिली.

मदतीसाठी धावले गॅस कंपनीतील कर्मचारी

गॅस गोदामाच्या समोरील कंपनीला आग लागताच भारत – गॅस प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी धाव घेतली. या प्लांटमधील उत्पादन थांबवून जवळपास – ५० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्लांटमधील – अग्निशमन यंत्रणेचे पाईप या कंपन्यांपर्यंत जोडून पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी मदत केली. त्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला नसता तर आगीने आणखीन रौद्र रुप धारण करीत इतर कंपन्यांपर्यंत आग पोहचली असती.

दोन तासानंतर मिळविले आगीवर नियंत्रण

आग विझविण्यासाठी महापालिका अग्नीशमन दलाचे, जैन इरिगेशनचे एकूण १० ते १५ बंब घटनास्थळी पोहचले. बंब रिकामे झाल्यानंतर ते तात्काळ गॅस गोदामासह रेमण्ड व इतर कंपन्यांमधून भरुन घटनास्थळी आणले जात होते. सुमारे ३० ते ४० बंबांसह फोमचा मारा केल्यानंतर दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच विशेष म्हणजे गॅस प्लांटमधून कंपन्यांजवळ उभ्या बंबांपर्यंत पाईप टाकून बंबांमध्ये पाणी भरले जात होते.

अग्निशमन विभागाची तत्परता

आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता महापालिकेतील एमआयडीसी परिसरातील अग्निशमन विभागातील प्रदीप धनगर, निवांत इंगळे, योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, किरण पाटील, रितेश पाटील, केतन पाटील, दीपक पाटील, भुषण पाटील, शोएब तडवी, नितीन ससाणे यांच्यासह भारत गॅसमधील कर्मचाऱ्यांनी मदत केली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या