“भारत आमचा मित्र” , इराणचा दिलासा; भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत
अमेरिका–इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची तयारी
नवी दिल्ली : “भारत आमचा मित्र आहे,” असे स्पष्ट करत इराणने भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भारतासाठी दिलासादायक घडामोड मानली जात आहे. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारतीय जहाजांना या महत्त्वाच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता १४ दिवस पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहेत. या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी पत्रकारांशी बोलताना भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळू शकतो, असे संकेत दिले. “भारत आमचा मित्र आहे. त्यामुळे या धोरणात्मक जलमार्गातून भारताला प्रवेश मिळावा यासाठी लवकरच पावले उचलली जातील,” असे ते म्हणाले. पत्रकारांनी भारताला सुरक्षित मार्ग मिळेल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय दिसून येईल, असे सांगितले.
राजदूत फथाली यांनी यावेळी भारताला इराणचा महत्त्वाचा भागीदार असल्याचेही नमूद केले. नवी दिल्ली आणि तेहरान यांच्यातील संबंध हे मैत्री आणि सहकार्यावर आधारित असून दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रांत सामायिक हितसंबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
होर्मुझ सामुद्रधुनीचे जागतिक महत्त्व :
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते आणि पुढे अरबी समुद्रात विलीन होते. सुमारे १६१ किलोमीटर लांबीची ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते.
या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने वाहतूक केली जातात. जगातील कच्च्या तेलाच्या व्यापारातील सुमारे २१ टक्के हिस्सा या मार्गावरून जातो. सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि इराक हे तेलउत्पादक देश आशियाई देशांकडे कच्चे तेल याच मार्गाने निर्यात करतात. याशिवाय जगभरातील मोठ्या प्रमाणातील द्रवित नैसर्गिक वायूची वाहतूकही याच जलमार्गातून केली जाते. त्यामुळेच होर्मुझ सामुद्रधुनीला जगाच्या तेलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
