एप्रिलमध्येच जळगाव जिल्हा तापला; पारा ४२.६° वर, ८३ जणांवर उपचार
उष्माघात कक्ष सज्ज; दोन मृत्यूंची नोंद , प्रशासनाचा ‘हीट अलर्ट’
जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हाचा तडाखा तीव्र होत असून जिल्ह्याचे तापमान सातत्याने ४० अंशांच्या पुढे गेले आहे. सोमवार, दि. ४ रोजी तापमान ४२.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून, एप्रिल महिन्यात तब्बल ८३ रुग्णांनी प्राथमिक उपचार घेतले आहेत.
उन्हामुळे पुरळ व घामोळ्याचा त्रास झालेल्या ७६ रुग्णांनी उपचार घेतले, तर उष्णतेमुळे स्नायूंना गोळे येण्याच्या तक्रारींमुळे ४४ जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये मुक्ताईनगर (१५), पारोळा (११), चोपडा (६), अमळनेर (४), रावेर (४) आणि जळगाव (३) तालुक्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उष्माघाताच्या संशयित दोन मृत्यूंची नोंद झाली असून त्यात जळगाव व अमळनेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
प्राथमिक उपचारांनी ३९ जणांचा बचाव
उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे दिसताच ३९ रुग्णांवर वेळेत उपचार करण्यात आले. यात थकवा, अंधारी येणे अशी लक्षणे असलेल्या ३१ रुग्णांचा आणि अल्पकाळ शुद्ध हरपलेल्या ८ जणांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक रुग्णांनी उपचार घेतल्याचे दिसून आले.
प्रशासनाचा इशारा : दुपारचे उन्ह टाळा
तापमान वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागात दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘हीट अलर्ट’ जारी करत नागरिकांना भरदुपारी कष्टाची कामे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात आले असून, लक्षणे जाणवल्यास त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे. तसेच शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
