जळगावात कोळसा मालवाहू रेल्वेच्या बोगीला आग !
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. शिवाजीनगर बाजूच्या नवीन तिकीट घराजवळ तसेच रेल्वे पुल परिसरात ही घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला माहिती दिली की, भुसावळकडून येणाऱ्या कोळसा मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
शिवाजीनगर अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाहन चालक किरण महाजन तसेच फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तत्परतेने आग विझविण्याचे काम सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
घटना रेल्वे पुलाजवळ आणि नवीन तिकीट घर परिसरात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, कोळशामधील उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
