भुसावळ रेल्वेचा ऐतिहासिक विक्रम! एकाच महिन्यात १.९ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; १२.२३ कोटींचा दंड वसूल
रेल्वे महसुलात मोठी भर; मे २०२५ चा विक्रम मोडीत काढत एप्रिलमध्ये ‘शून्य-सहिष्णुता’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
भुसावळ | प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरुद्ध एप्रिल २०२६ महिन्यात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सघन मोहीम राबवून इतिहास रचला आहे. या एकाच महिन्यात तब्बल १ लाख ९ हजार प्रकरणांची नोंद करत १२.२३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, विभागाच्या इतिहासातील ही सर्वोच्च मासिक कामगिरी ठरली आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील:
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातील कारवाईचा आकडा थक्क करणारा आहे:
विनातिकीट प्रवास: ६३,६०८ प्रकरणे – ६.७० कोटी रुपयांची वसुली.अनियमित प्रवास: ४४,७३८ प्रकरणे – २.१८ कोटी रुपयांची वसुली.विना बुकिंग सामान: ४०४ प्रकरणे – ५० हजार रुपयांची वसुली.
जुना विक्रम मोडीत:
यापूर्वी मे २०२५ मध्ये विभागाने ११.२० कोटींचा मासिक महसूल जमा केला होता. मात्र, यंदा विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिलमध्ये १२.२३ कोटींची कमाई करून नवीन मानदंड प्रस्थापित केला आहे.
नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर:
विभागीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये अचानक तपासणी करून विनातिकीट प्रवासाबाबत ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण राबवले जात आहे.
डिजिटल तिकीटाचे आवाहन:
प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवरील रांगा टाळण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी ‘UTS’ किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून अधिकृत तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी केले आहे.
