जळगावात जोशी पेठेत अवैध वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला अटकेत
आश्रय देणाऱ्यालाही बेड्या; शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई
जळगाव I प्रतिनिधी शहरात विनापरवाना राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शनिपेठ पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे. जोशी पेठेतील भोई गल्ली येथे छापा टाकून एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिला आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिपेठ पोलिसांनी जोशी पेठ परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, मूळ रा. बांगलादेश) या बांगलादेशी महिलेला कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवानगी नसताना जळगावात अवैधरित्या राहत असल्याचे आढळून आले.
तपासात समोर आले की, ही महिला अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून गेल्या काही काळापासून जळगावात लपून राहत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
दरम्यान, तिला जाणूनबुजून आश्रय देणारा चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर संबंधित महिलेला लपवून ठेवण्याचा आरोप आहे.
या प्रकरणी इमिग्रेशन अॅक्ट आणि परदेशी कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जळगाव पोलिस ठाण्याकडून अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये सातत्याने कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधावा.