Tuesday, November 3, 2026
HomeBlogशहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

महापौर स्वच्छता संकल्प अभियानातील ५ वॉर्डांसाठी आढावा बैठक; बीव्हीजी कंपनीला दुप्पट क्षमतेची वाहने पुरवण्याचे आदेश

जळगाव:‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी सुरू केलेल्या स्वच्छता पाहणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आतापर्यंत १ ते ५ प्रभागांची (वॉर्ड) पाहणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौरांनी स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या प्रतिनिधींची संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाहणीदरम्यान समोर आलेल्या समस्यांवर सखोल मंथन करण्यात आले.

काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवा
बैठकीत बोलताना महापौर काळे म्हणाल्या, “स्वच्छता निरीक्षक हा संपूर्ण योजनेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी योग्य नियोजन केल्यास संपूर्ण वॉर्ड स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो. ज्या वॉर्डातील कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील अथवा काम करणार नाहीत, त्यांना थेट घरी पाठवा,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच सर्व स्वच्छता निरीक्षकांनी आपापले वॉर्ड आदर्श आणि ‘मॉडेल वॉर्ड’ बनवून दाखवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

बीव्हीजी कंपनीचे कान उपटले; जुनी वाहने बदलण्याचे निर्देश
स्वच्छता निरीक्षकांमध्ये काम करण्याची क्षमता आहे, मात्र ‘बीव्हीजी’ कंपनीकडून पुरेशा प्रमाणात कचरा संकलनाची वाहने मिळत नसल्याने कामात अडथळे येत असल्याचे बैठकीत समोर आले. यावर महापौरांनी बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. बीव्हीजीने तात्काळ आवश्यक वाहने उपलब्ध करून द्यावीत, जुनी व नादुरुस्त वाहने बदलावीत आणि गरजेनुसार दुप्पट क्षमतेची वाहने पुरवावीत, जेणेकरून जमा झालेला कचरा वेळेवर उचलला जाईल, असे सक्त निर्देश त्यांनी दिले.

तक्रारदारांच्या स्वाक्षऱ्या डायरीत घ्या
नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी महापौरांनी विशेष सूचना दिल्या. स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांनी आपल्या दैनंदिन नोंदींसाठी डायऱ्या मेंटेन ठेवाव्यात. नागरिकांच्या तक्रारी सोडवल्यानंतर तक्रारदारांची स्वाक्षरी त्या डायरीत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

महापौरांचे महत्त्वपूर्ण आदेश व निर्देश
उघडी शौचालये पाडण्याचे आदेश : ममुराबाद रस्ता आणि पिंप्राळा भागातील उघडी (खुली) शौचालये तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश दिले.
नाल्यांची सफाई : आसोदा रोडवरील पुलाजवळील शौचालय साफ करणे आणि गोपाळपुरा नाला तात्काळ साफ करण्याचे निर्देश दिले.
धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण : शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अपघात घडण्यापूर्वी त्या हटवण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या.
वॉशिंग सेंटरवर कडक कारवाई : शहरात बिनदिक्कत सुरू असलेल्या व पाणी वाया घालणाऱ्या वॉशिंग सेंटर्सना तंबी द्यावी आणि आठवड्यातून फक्त दोनच दिवस ते सुरू ठेवता येतील का, याबाबत नियोजन करण्याचे निर्देश दिले.
रस्त्यांची दुरुस्ती : कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या मार्गावरील रस्ते सुस्थितीत करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर चकाचक आणि स्वच्छ झालेच पाहिजे. यासाठी सर्वच विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे.”
— दीपमाला काळे, महापौर (जळगाव शहर महानगरपालिका)

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या