बनारस आणि अयोध्या एक्सप्रेसचे भुसावळात जल्लोषात स्वागत; भाविकांसाठी थेट प्रवासाची सोय
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती; पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन नव्या गाड्यांचा शुभारंभ
भुसावळ | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलेल्या दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे बुधवारी दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या कॅन्ट–मुंबई (एलटीटी) या दोन गाड्यांमुळे आता जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविकांना बनारस आणि अयोध्येसाठी थेट रेल्वे प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या कॅन्ट–मुंबई (एलटीटी) या अत्याधुनिक ‘अमृत भारत’ एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले होते. या गाड्यांच्या पहिल्या फेरीनिमित्त ठिकठिकाणी स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
भुसावळ स्थानकावर उत्साहाचे वातावरण
बुधवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १२:१५ वाजता या नवीन गाड्यांचे भुसावळ स्थानकावर आगमन झाले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून रेल्वे इंजिनचे पूजन केले आणि गाड्यांचे स्वागत केले. “अमृत भारत एक्सप्रेसमुळे अयोध्येतील प्रभू श्रीराम आणि काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे,” अशा भावना खासदार खडसे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या स्वागत सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व शहरातील पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानकावर ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात प्रवाशांचेही स्वागत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यासाठी रेल्वेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या नवीन गाड्यांमुळे उत्तर भारताशी कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार आहे.
