अमळनेरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना; रेल्वे पुलाजवळील खदानीत बुडून तिघा बालमित्रांचा मृत्यू
सेल्फी काढण्याच्या नादात काळाचा घाला; सिंधी कॉलनीवर शोककळा
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर-चोपडा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खदानीत मंगळवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, सेल्फी काढताना आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सिंधी कॉलनीतील तीन बालमित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे.
मृत बालकांची नावे
मानव बंटी रत्नानी
कार्तिक विकी उधवानी
दिनेश विजय पंजवानी
(तिन्ही रा. सिंधी कॉलनी, अमळनेर)
घटना कशी घडली?
प्राथमिक माहितीनुसार, तिघे मित्र रेल्वे पुलाजवळील खदान परिसरात फिरण्यासाठी व पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोबाईलवर सेल्फी काढत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी खोल असल्याने तिघांचाही जीव वाचविता आला नाही.
परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच कॉलनीतील तीन निष्पाप मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सूचना : पावसाळ्यात नदी, तलाव, खदान किंवा इतर जलाशयांजवळ सेल्फी काढणे किंवा जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत. पालकांनीही मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
