हद्दपार सराईत ‘भोमपाली’च्या मुसक्या आवळल्या; एलसीबीकडून गावठी पिस्तूल जप्त
गेंदालाल मिल परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत असताना कारवाई; आठ गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पुन्हा जेरबंद
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारावर धडक कारवाई करत त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त केले आहे. गेंडालाल मिल परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील हद्दपार सराईत गुन्हेगार विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२, रा. बौद्ध विहाराजवळ, गेंडालाल मिल, जळगाव) हा गेंडालाल मिल परिसरातील लोकशेड भागात विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे.
माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील गेंडालाल मिलजवळील लोकशेड येथे सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आले.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद
आरोपी विजय उर्फ भोमपाली याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल आणि शस्त्र कायद्यांतर्गत असे एकूण आठ गंभीर गुन्हे जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडणे, राहुल रगडे आणि प्रदीप सपकाळे यांच्या पथकाने केली. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
