उमाळा घाटात भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
नादुरुस्त ट्रकला कारची धडक; पाच जण जखमी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ गुरुवारी (१६ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला कारची धडक बसून हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेला “वन मिस्टेक गेम ओव्हर” हा संदेश घटनास्थळी उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.
दोघांचा जागीच मृत्यू, पाच जखमी
या अपघातात इस्राईल शेख इरफान (वय २१, रा. अजिंठा) आणि पंकज हरीष बैंडवाल (रा. इंदूर) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप ऊर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी हा गंभीर जखमी असून, गिरीश योगेश चव्हाण (रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (रा. खेडी) यांच्यासह अन्य जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नादुरुस्त ट्रकवर नव्हती सुरक्षेची कोणतीही व्यवस्था
अपघातग्रस्त ट्रक तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यालगत उभा करण्यात आला होता. मात्र, ट्रकच्या मागे रिफ्लेक्टर, इशारा फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. संध्याकाळच्या वाढत्या अंधारात हा ट्रक चालकाच्या नजरेस उशिरा पडल्याने दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अशी घडली दुर्घटना
परदेशी कुटुंबातील तरुण बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, अजिंठा परिसरातील साईटकडे जाण्यासाठी ते एमएच-१९-ईपी-२०६६ क्रमांकाच्या कारने निघाले होते. उमाळा घाटाजवळ पोहोचताच रस्त्याच्या एका लेनमध्ये उभा असलेला जीजे-०४-एएक्स-२२८० क्रमांकाचा ट्रक अचानक समोर आल्याने चालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार दुभाजकावर आदळून सुमारे ५० ते ६० फूट दूर जाऊन जोरात आपटली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
जखमींना मदतीसाठी नागरिकांची धावपळ
अपघातानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून मदतीची विनंती केली. मात्र, बराच वेळ कोणतेही वाहन थांबले नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच मृत व जखमींच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
