जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर
आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याला यश; अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्ग होणार अधिक सुरक्षित व सुशोभित
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. ही माहिती आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रमुख मार्गावर आधुनिक प्रकाश व्यवस्था
या निधीतून अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होऊन वाहनचालक, पादचारी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
या कामासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावाला पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभल्याने निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नेत्यांचे मानले आभार
या विकासकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले आहेत.
‘विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील’
जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, भविष्यातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी म्हटले आहे.
