स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; हजारोंचा साश्रुनयनांनी निरोप
मुंबई : वृत्तसेवा — आशा भोसले यांनी आपल्या चिरतरुण आवाजाने आठ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आणि सोमवारी सायंकाळी त्या अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी हजारो चाहत्यांनी सानुनयनांनी आपल्या लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप दिला. मराठी, हिंदी सिनेमा तसेच क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील ७०० हून अधिक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
अंत्ययात्रेत घोषणांनी दुमदुमला परिसर
सोमवारी सकाळी लोअर परळ येथील निवासस्थानी आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी ३.१० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. “जब तक सूरज चाँद रहेगा, आशाताई का नाम रहेगा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करत आपल्या लाडक्या गायिकेला भावपूर्ण निरोप दिला. मुंबई पोलिसांनी मानवंदना दिली असून पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आले होते.
स्मृतीनिमित्त संगीत संस्थेचा निर्णय
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील जागतिक दर्जाची संगीत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत सांगितले की, आशाताईंनी त्यांच्या हयातीतच असा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. आता हा प्रस्ताव गतीने पुढे नेऊन संस्था प्रत्यक्षात उभी करण्यासाठी तातडीने प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
