Thursday, February 5, 2026
Homeखानदेश६३ जागांसाठी ३२१ उमेदवार मैदानात

६३ जागांसाठी ३२१ उमेदवार मैदानात

६३ जागांसाठी ३२१ उमेदवार मैदानात

महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार; तिरंगी-पंचरंगी लढती अटळ

जळगाव (प्रतिनिधी):
शहर महानगरपालिका निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले असून, आता प्रत्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्यास सज्ज झाला आहे. शहरातील १९ प्रभागांतील ६३ जागांसाठी तब्बल ३२१ उमेदवार रिंगणात उतरले असून, यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती अटळ ठरल्या आहेत. सुरुवातीलाच महायुतीने १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली असली, तरी उर्वरित जागांवर महाविकास आघाडी, अपक्ष तसेच इतर पक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

महापालिकेच्या मागील तीन-चार पंचवार्षिक निवडणुकांच्या इतिहासाकडे पाहिले असता, इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध निवडी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे. या प्रक्रियेत सुमारे ३१७ उमेदवारांनी माघार घेतली असून, या माघारींसाठी साम-दाम-दंड-भेद वापरल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापवले आहे. काही ठिकाणी पदांची आश्वासने, काही ठिकाणी आर्थिक व्यवहार तर काही ठिकाणी दबावाचा वापर झाल्याची कुजबुज शहरात ऐकू येत आहे.
बहुतेक प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याविरुद्ध शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी थेट लढत दिसून येत असली, तरी मनसे, एमआयएम आणि अपक्ष उमेदवार निकालांची गणिते बिघडवू शकतील, असे संकेत आहेत. तिरंगी-चौरंगी लढतींमुळे अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तिकीट वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत नाराजी उफाळून आली असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी दिल्यामुळे काही प्रभागांत अंतर्गत गटबाजी उघडपणे दिसून येत आहे. ही नाराजी मतदानाच्या दिवशी कुणाला फटका देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माघारीची मुदत संपताच उमेदवारांनी गल्लीबोळांत प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामांच्या आश्वासनांचा पाऊस पडत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती समर्थकांनी बिनविरोध विजयाचा जल्लोष ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत साजरा केला असला, तरी खरा संघर्ष आता सुरू झाला आहे. १५ जानेवारीच्या मतदानाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, जळगावच्या राजकारणाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या