Thursday, February 5, 2026
Homeखानदेशजळगाव मनपाच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय उलथापालथी

जळगाव मनपाच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय उलथापालथी

जळगाव मनपाच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय उलथापालथी

महायुतीची बैठक फिस्कटली; भाजप स्वबळावर? तर महाविकास आघाडीचा ३८–३७ फॉर्म्युला जाहीर

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २८ डिसेंबर) राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, एकीकडे सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला असताना दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून आघाडी घेतली आहे. अजिंठा विश्रामगृहात पार पडलेली महायुतीची निर्णायक बैठक अखेर निष्फळ ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेकडून २५ जागांची ठाम मागणी करण्यात आली; मात्र भाजपकडून शिवसेनेला १९ व राष्ट्रवादीला ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेनेकडे २५ ‘विनिंग सीट्स’ असल्याचा दावा करत हा प्रस्ताव अमान्य करण्यात आल्याने चर्चेला तणावपूर्ण वळण लागले. अपेक्षित जागा न मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे.

बैठक संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे अंतर्गत चर्चा झाली. यानंतर मंत्री गिरीश महाजन पुढील दाराने, तर आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजूमामा भोळे मागील दाराने कोणालाही न भेटता विश्रामगृहातून बाहेर पडले. पुढे मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत रेल्वेने नाशिककडे प्रस्थान केले. भाजप ७५ पैकी सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत यामुळे अधिक ठळक झाले असून, सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महायुतीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मात्र आपली रणनीती स्पष्ट करत निवडणूक रणांगणात आघाडी घेतली आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ३७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. मनपाच्या एकूण ७५ जागांसाठी ‘३८–३७’ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या चर्चांमुळे संभ्रमाचे वातावरण होते. मात्र भाजप-शिवसेना महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी चौधरी यांनी मित्रपक्षांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, संबंधित पक्षप्रमुख आपल्या वाट्याच्या जागांतून मित्रपक्षांना जागा सोडतील, तसेच लहान पक्षांशी चर्चा सुरू असून आवश्यकतेनुसार जागावाटपात फेरबदल केला जाईल, असेही स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उमेशदादा पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, महानगरप्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे महायुतीत फूट पडण्याची चिन्हे स्पष्ट होत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला फॉर्म्युला जाहीर करून निवडणूक लढतीला धार दिली आहे. या नव्या राजकीय समीकरणांमुळे जळगाव मनपाची निवडणूक आता थेट, चुरशीची आणि रंगतदार ठरणार हे निश्चित झाले असून, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

ताज्या बातम्या