“गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव प्रतिनिधी : “ग्रामपंचायत हे गाव विकासाचे मंदिर असून गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला-पुरुषांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पार पडला.
या वेळी पालकमंत्री म्हणाले की, “सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. महिलांनी लहानमोठे उद्योग उभे करून ‘लखपती दीदी’ व्हावे. मंत्रिपदाची गरिमा जपत मी आपला भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडतो. गावोगावी केलेल्या विकासकामातून मिळणारे प्रेम कधीही विसरणार नाही.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी भूषवले होते. या प्रसंगी गावातील पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र यांसह विविध योजना लाभांचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक संदीप सुरळकर, सूत्रसंचालन बी. बी. धाडी, तर आभार विकास जाधव यांनी मानले.
या वेळी सरपंच कविताबाई सपकाळे, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, दूध संघ संचालक रमेश आप्पा पाटील, ग्रामसेवक नारायण खोडपे, महिला बचत गटाच्या महिला, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.