आर.डी. बर्मन यांच्या गीतांची सुरेल मैफल सोमवारी जळगावात
पंचमदाचे मूळ वादक विजय काटकर यांचे १० वाद्यांवरील सादरीकरण ठरणार आकर्षण
जळगाव (प्रतिनिधी) : स्व. आर. बी. पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सायं. ५ ते रात्रौ ९ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संगीतप्रेमींसाठी विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत संगीतप्रेमींना आर.डी. बर्मन यांच्या अजरामर गीतांचा सुरेल ठेवा अनुभवता येणार आहे. अशी माहिती आयोजक योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार आणि स्व.आर डी बर्मन यांचे मूळ वादक असलेले विजय काटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी काटकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन आर डी बर्मन यांच्या बारा वर्षाच्या सहवासात आलेले गोड अनुभव सांगितले. आजच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या जमान्यात पारंपारिक वाद्य हरपली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे पंचमदांचे मूळ वादक विजय काटकर यांची प्रत्यक्ष उपस्थिती. त्यांच्या विविध प्रकारच्या 10 वाद्यांच्या सादरीकरणामुळे रसिकांना खऱ्या अर्थाने ‘पंचम’दा यांचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यावरून आताचे इलेक्ट्रॉनिक वाद्य आणि पारंपारिक वाद्य यांच्यातील फरक रसिक प्रेक्षकांना समजणार आहे.
प्रमुख गायक म्हणून डॉ. राजेश पाटील, मिलींद पाटील, प्रा. नितीन महाजन, संघपाल तायडे, उज्वला वर्मा आणि सोनल कपोते आपले सुरेल गाण्यांनी वातावरण रंगवणार आहेत. विविध क्षेत्रातील हे गायक एकत्र येऊन सादर करणार असलेली ही मैफल संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आर. बी. मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.