जळगाव: मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या एका क्षुल्लक कारणावरून एका बापाने आपली अकरावीत शिकणाऱ्या मुलीला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याची आणि पत्नीलाही जखमी केल्याची धक्कादायक घटना जळगावातील चंदू अण्णा नगर येथे घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या या नराधम बापाच्या अमानुष कृत्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली. समाधान विजयसिंग पाटील (वय ३२) हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नीच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे लावले. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील, जी अभ्यासात मग्न होती, तिने शांतपणे वडिलांना गाणे बंद करण्याची विनंती केली. मात्र, वडिलांनी ऐकले नाही म्हणून प्राप्तीने स्वतःच गाणे बंद केले. याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या समाधानने पत्नी जागृती पाटील हिला काचेचा ग्लास फोडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
आईला वाचवण्यासाठी प्राप्ती पुढे आल्यावर, त्या क्रूर बापाने तिलाही सोडले नाही. त्याने कुकरचे झाकण घेऊन तिच्या हातावर मारले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर हादरलेल्या प्राप्ती आणि जागृती यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर आरोपी समाधान पाटील हा आपल्या मूळ गावी, कल्याणेहोळ येथे पळून गेला. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे त्याने आपल्या आई-वडिलांना “या दोघींचा खून करणार” अशी धमकी दिली.
या प्रकरणी पत्नी जागृती पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात आरोपी समाधान पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, मात्र या घटनेमुळे शहरात कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.